Desh

…तर काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार – कमल हसन

By PCB Author

October 14, 2018

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेसने द्रमुकसोबतची युती तोडल्यास आपण २०१९ च्या लोकसभा निवडणूकांसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहोत, असे महत्त्वपूर्ण विधान दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. काँग्रेससोबत युती केल्यास तामिळनाडूतील जनतेला विकासाच्यादृष्टीने निश्चितच फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

 

एका खासगी वृत्तवाहिनीशी हसन बोलत होते. कमल हसन यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात राहात होतो. पण, आता राजकारणाच्या माध्यमातून मला तामिळनाडूच्या जनतेच्या घराघरात पोहोचायचे आहे, जनतेत राहायचे आहे. राजकारणात सक्रिय असताना जनसेवेलाच माझे प्राधान्य असेल’, असे ते म्हणाले होते.

 

दरम्यान, जूनमध्ये कमल हसन यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात तमिळनाडूतील राजकारणाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही राजकारणाबाबत बोललो, मात्र तुम्ही विचार करताय तसे काही झाले नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे केलेले विधान तामिळनाडूतील राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.