…तर इम्तियाज जलील यांचाही ‘औरंग्या’झाल्याशिवाय राहणार नाही- शिवसेना

0
409

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – गेली चार वर्षे आमदार असताना इम्तियाज जलील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणास गैरहजर होते. मराठवाड्यात १७ सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली होती. त्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान, शिवसेनेनेही सामना मधील अग्रलेखातून जलील यांच्यावर टीका करत त्यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले आहे.

इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता. आता तो नवा आहे. त्यामुळे आजचा एमआयएम पक्ष वेगळा आहे, हे ध्वजारोहणास उपस्थित राहून दाखवून द्यावे, अशी अपेक्षा पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केली होती. त्यावर “माझ्या उपस्थिती अथवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता लक्षात येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही,” असे उत्तर दिले होते. त्यात मंगळवारच्या कार्यक्रमाला खासदार जलील हे गैरहजर राहिल्याने वादाला तोंड फुटले होते. शिवसेनेने आता जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱया खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये. देवेंद्रजी, काढा हा फतवा! महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये! अशा शब्दात शिवसेनेने त्यांना खडेबोल सुनावले आहेत.