Desh

…तर आंदोलन अधिक तीव्र करू; शेतकरी संघटनांचा इशारा

By PCB Author

January 03, 2021

नवी दिल्ली,दि.०३(पीसीबी) – ४ जानेवारीला शेतकरी आणि सरकारची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. या चर्चेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे कारण ही चर्चा निष्फळ ठरली तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. आता तर शेतकऱ्यांनी उद्याची चर्चा निष्फळ ठरली तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढू असंही म्हटलं आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर तरतूद करावी यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आत्तापर्यंत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमधले शेतकरी ३८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर २६ जानेवारीच्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीत ट्रॅक्टर परेड करु. राजधानी दिल्लीतील मुख्य परेडनंतर किसान परेड होईल असं शेतकरी नेते दर्शनपाल सिंग आणि अभिमन्यू कोहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्हाला शांततापूर्ण मार्गाने तोडगा हवा आहे. मोदी सरकारच्या आश्वासनांवर आम्हाला विश्वास नाही असेही शेतकरी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान मोदी सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करणं आणि एमएसपीची कायदेशीर तरतूद या दोन मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. गेल्या ३८ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत याबाबत निर्णय घेतला गेला.