तरुणांनी नोकरी बरोबर व्यवसायाच्या संधी शोधाव्यात – महापौर माई ढोरे

0
498
पिंपरी, दि.२० (पीसीबी) – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज, निगडी येथे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिका दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय उपजीविका अभियान व कौशल्य विकास रोजगार केंद्र यांच्या संयुक्तपणे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला. आजच्या तरुणांनी नोकरी शोधण्याबरोबर व्यवसायातील विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. रोजगार मागणाऱ्या तरुणांपेक्षा रोजगार देणारे तरुण निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले.
महापौर माई म्हणाल्याआज अनेक तरुण चांगले शिक्षण घेत आहेत , या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी करावा.मात्र या ज्ञानाचा उपयोग करून तरुणांनी स्वतःचा व्यवसाय विकसित करावा.सुशिक्षित तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बँका आर्थिक साह्यय देऊ शकतात.भविष्यात असे तरुण व्यावसायिक अनेक बेरोजगारांना रोजगार देऊ शकतात.तसेच तरुणांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता , खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधींचा विचार करावा.
उपायुक्त मा. संतोष पाटील म्हणाले, आजच्या तरुणांनी संधीचा योग्य उपयोग करून रोजगार मिळविला पाहिजे. पिं.चिं. शहरात अनेक बड्या कंपन्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे ,यासाठी अनेक कुशल कामगारांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी महापालिकेच्या वतीने २८ ते २९ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या फेस्टिवल ऑफ फ्युचरया योजनेची माहिती दिली.
शरद इनामदार म्हणाले, आज नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या तरुणांनी आत्मविश्वासाने मुलाखती देऊन नोकरी मिळवावी. कुशल तरुणांना रोजगार देण्यासाठी शहरातील अनेक कंपन्या सहभागी झाल्याने अनेकांना रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याकरीता  नलावडे सर, वाळुंज सर, डॉ संजय खरात उपस्थित होते.