तब्बल १.३४ लाख वॅगनआर, बलेनो परत मागवल्या, कारण…

0
323

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने आपल्या एकूण 1 लाख 34 हजार 885 कार परत मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे गाड्या ‘रिकॉल’ करण्यात आल्याची माहिती आहे.

कोणते मॉडेल्स केले रिकॉल ?:-
1-लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या 56 हजार 663 कार परत मागवण्यात आल्या आहेत. या वॅगनआर कार 15 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. तर, 78,222 बलेनो कार रिकॉल केल्या आहेत. या बलेनो कार 8 जानेवारी 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे गाड्या ‘रिकॉल’ करण्यात आल्या आहेत. यासाठी कंपनीने डिलर्सना ग्राहकांशी संपर्क करण्यास सांगितलं आहे. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यास तो दूर करुन ग्राहकांना गाड्या परत केल्या जातील, यासाठी ग्राहकांकाडून पैसे आकारले जाणार नाहीत असे कंपनीने स्पष्ट केले आहे. एकूण 1 लाख 34 हजार 885 कार कंपनीने परत मागवल्या आहेत.

ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही आपल्या गाडीचा यामध्ये समावेश आहे की नाही हे चेक करु शकतात. यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या ‘Important Customer Info’ सेक्शनवर क्लिक करावं लागेल. इथे गाड्यांच्या रिकॉलची सूचना देण्यात आली आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल, त्याखाली Click here पर्यायावर क्लिक केल्यानंतर एका बॉक्समध्ये गाडीचा चेसिस नंबर टाकल्यास तुमची गाडी रिकॉल करण्यात आली आहे, की नाही याबाबत माहिती मिळेल.