Maharashtra

तब्बल दहा वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व

By PCB Author

November 03, 2022

बीड,दि.०३(पीसीबी) – बीडच्या परळी येथील पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे.

पांगरी येथेच गोपीनाथ गड आहे. त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची ठरते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता याच गावातून धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवत पंकजा मुंडेंची दहा वर्षांची सत्ता उलथवली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वावरच गदा आल्याची चर्चा सुरु आहे.

पांगरी सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात गेल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे. याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारली होती. तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करणारे धनंजय मुंडे जायंट किलर ठरले होते.