Maharashtra

तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेत्री डेझी शाहला पोलिसांचे समन्स

By PCB Author

November 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी)- तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी आता अभिनेत्री डेझी शाहला समन्स पाठवले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी डेझी शाह ही नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांची सहाय्यक होती. त्यावेळी डेझीला तनुश्रीला नृत्याच्या स्टेप्स शिकवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

डेझीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले होते. ‘हॉर्न ओके प्लिज’ चित्रपटाच्या सेटवर मी तनुश्रीला नृत्याच्या स्टेप्स शिकवत होते. सलग दोन दिवस सर्वकाही व्यवस्थित होते. परंतु, तिसऱ्या दिवशी असे काही झाले की तनुश्रीचा मूड खराब झाला, असे तिने सांगितले. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात चौकशीनंतर मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल केले आहे. सुमारे १० वर्षांनंतर याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी डेझी शाहलाही चौकशीसाठी बोलावले आहे. साक्षीदाराच्या स्वरुपात डेझीचे म्हणणे नोंदवले जाईल आणि या प्रकरणाचा तपास पुढे जाईल.