Pimpri

तडीपार आरोपीला पिंपरी पोलिसांनी केले अटक

By PCB Author

October 17, 2018

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पुणे शहरासह जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) रात्री अकराच्या सुमारास रामनगर चिंचवड येथे करण्यात आली.

बाळू रोहिदास मोहिते (वय ३१, रा. राममंदिराच्या पाठीमागे, रामनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हा सराईत आरोपी आहे. पिंपरी पोलिसांनी त्याला ११ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी तडीपार केले होते. मात्र मंगळवारी बाळू हा पुन्हा रामनगरमध्ये आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार तातडीने कारवाई करत बाळू याला अटक केली. त्याच्यावर तडीपारीचा आदेश भंग केल्या प्रकरणी कलम १४२ अनुसार पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.