Pimpri

तडीपार आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

By PCB Author

June 30, 2020

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आढळून आल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 29) काळाखडक झोपडपट्टी येथे करण्यात आली आहे.

संदीप उर्फ बाळु शांताराम भोसले (वय 28, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सागर शेडगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील फरार असलेल्या टॉप 25 आरोपींचा शोध घेत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक निशांत काळे आणि उमेश पुलगम यांना माहिती मिळाली की, तडीपार केलेला आरोपी संदीप भोसले हा काळाखडक वाकड येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संदीप याला अटक केली.

संदीप भोसले याला 22 सप्टेंबर 2018 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो पोलिसांची परवानगी न घेता जिल्ह्यात आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.