ढाके यांनी कुवतीनुसार राहावे – विरोधीपक्षनेते नाना काटे

0
495

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या कुवती नुसार राहावे, असा टोला महापालिकेतील विरोधीपक्ष नेते नाना काटे यांनी लगावला आहे. आज जगताप डेअरी चौकातील पुलाचे उद्धघाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालक मंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते झाले. त्याबाबत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आक्षेप घेतला आणि टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसनेने त्यांना तत्काळ प्रसिद्धी पत्रकातून उत्तर दिले.


पत्रकात म्हटले आहे की, जगताप डेअरी चौकातील पुलाचे उद्धघाटन महापौराच्या हस्ते काही नगरसदस्यांच्या उपस्थितीत अनधिकृतपणे करण्यात आले होते. वस्तुत: सदरचा पुल प्राधिकरणाचा असल्यामुळे आपण प्राधिकरणाच्या संबंधित अधिका-यांशी याबाबत चर्चा करुन या पुलाचा उद्धघाटनाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे होता. तसेच पालिकेच्या विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्धघाटन करावयाचे असेल तर ते राजशिष्टाचाराप्रमाणे पालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध पक्षाचे गटनेते व प्रशासन यांच्याबरोबर मिटींग घेऊन सागोपांग चर्चा अपेक्षित होती. सर्वानुमते दिनांक, वेळ व उद्धघाटन कोणाच्या हस्ते करावयाचे याबाबत निर्णय होऊन त्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका छापून त्या कार्यक्रमास पूर्व प्रसिध्दी दिली जाते.


या पुलाच्या उद्धघटनाबाबत आम्ही यापूर्वीच म्हणजे दिनांक १०/०२/२०२० रोजी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन या पुलाचे काम पूर्ण झाले असल्यास उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री व पुणे जिल्हा पालक मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्या पुलावर राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग अपूर्ण आहे. हे काम पूर्ण झाल्या नंतर लगेचच पालक मंत्र्याची वेळ घेऊन सदरचे पुलाचे उद्धघाटन तातडीने करण्यात येईल, असे सांगितले होते.
त्यानुसार प्राधिकरच्या अधिका-यांनी अजितदादांची वेळ घेऊन आज उद्घाटन करण्यात आलेले आहे. मागील दोन महिने लॉक डाऊनमुळे या कालावधीमध्ये नागरीकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झालेली नाही. तसेच कोरोनाचे सावट लक्षात घेऊनच अजितदादांनी पिंपरी चिंचवड मनपास भेट देऊन कोरोना विषयक सर्व माहिती घेतली. व त्याबाबत आवश्यक त्या सुचना आयुक्तांना दिलेल्या आहेत. मनपाचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विरुध्द बोलण्याची कुवत नाही व ती त्यांनी करु नये एवढेच या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो, असे नाना काटे यांनी म्हटले आहे.