ड्रेनेज लाईनच्या कारणावरून तिघांना बेदम मारहाण

0
337

चाकण, दि. १२ (पीसीबी) – ड्रेनेज लाईनच्या कारणावरून एका वृद्ध व्यक्तीला हॉकी स्टिकने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या मुलाला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या चुलत भावाला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. याबाबत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी मुळेवस्ती, आंबेठाण रोड येथे घडली.

लक्ष्मण हरिभाऊ मुळे (वय 62, रा. मुळेवस्ती, आंबेठाण रोड, बिरदवडी), कुणाल लक्ष्मण मुळे, सचिन विष्णू मुळे अशी जखमींची नावे आहेत. लक्ष्मण मुळे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय पोपट मुळे आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरी आराम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ड्रेनेज लाईनच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून ‘तुला लय माज आला आहे का’ असे म्हणून अक्षय याने फिर्यादी यांना हॉकी स्टिकने पाठीवर जोरात मारले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा कुणाल आला. त्यालाही आरोपींनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हॉकी स्टिकने कुणालच्या पायावर मारून दुखापत केली. तिथे फिर्यादी यांचा चुलत भाऊ सचिन मुळे आला असता आरोपींनी त्यांनाही रॉडने मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.