Maharashtra

“ड्रीम्स मॉल अग्नी दुर्घटनेत हलगर्जीपणामुळे गेले १२ बळी; ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”; भाजपचा हल्लाबोल

By PCB Author

March 27, 2021

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील ‘ड्रीम्स मॉल’मध्ये गुरुवारी लागलेल्या आगीने तेथील करोना रुग्णालयातील १२ रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. अग्निप्रतिबंधक अटींची कोणतीही पूर्तता न करताच मॉलमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आल्याने या दुर्घटनेमुळे रुग्णालय आणि मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोविड रुग्णांसाठी मॉलमध्ये रुग्णालय उभारण्यास परवानगी मिळालीच कशी? त्यामुळे भाजपाने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

भाजपने टीका करताना म्हंटल आहे कि, “भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं! भंडारा ते भांडुप… राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता विचार केला, तरी अशा धोकादायक रुग्णालयांची संख्या तब्बल ७६२ आहे… महापालिकेच्याच फायर ऑडिटमधली ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का ठाकरे सरकार…?” असा सवाल देखील भाजपाकडून करण्यात आला आहे.

“अग्निसुरक्षेसाठी १२० दिवसांची मुदत दिली असतानाही २१९ खासगी, ३ सरकारी आणि २८ पालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या नाहीत. पालिकेनेही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. मग आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही?” असा जाब भाजपाने ठाकरे सरकारला विचारला आहे. एवढच नाहीतर “भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १५६ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी ४३ कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे १२ निष्पाप बळी गेले.असा आरोप देखील भाजपने केला आहे.