Desh

ड्रग्ज प्रकरणात ‘या’ बड्या भाजपा नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक

By PCB Author

February 24, 2021

– फरार होण्याचा प्रयन्त पुरता फसला 

पश्चिम बंगाल, दि.२४ पीसीबी) : कोलकाता पोलिसांनी पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करत भाजपा नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही मोठी कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना घरातून अटक करण्यात आली आहे. हि कारवाई पोलिसांनी केली तेव्हा पश्चिम बंगालमधून हे सर्व फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता पामेला गोस्वामी हिला कोकेन आणि १० लाख रुपयांसह ताब्यात घेतले होते. पोलिसांनी याप्रकरणी पामेला गोस्वामी हिच्यासह आणखी दोन जणांना अटक केली होती. नंतर याप्रकरणात भाजपाचे नेते राकेश सिंह यांचं नाव समोर आलं होतं. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपाचे महासचिव असलेल्या कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय असलेल्या राकेश सिंह यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. राकेश सिंह यांनी नोटीस बजावल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली मात्र न्यायालयाने त्यांची याचिका साफ फेटाळून लावली. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलामध्ये बाचाबाची झाली.

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी त्यानंतर घराची झडती घेतली. राकेश सिंह यांना नोटीस बजावण्यात आली होती, त्यांना ४ वाजेपर्यंत हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते बंगालमधून फरार होण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांच्या कानी आल्यानंतर कोलकाता पोलिसांनी राकेश सिंह यांना पूर्व वर्धमान जिल्ह्यातून अटक केली. त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाईमध्ये अडथळा आणल्याबद्दल राकेस सिंह यांच्या दोन्ही मुलानांही अटक करण्यात आली आहे.