ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? – नवाब मालिकांचा एनसीबी व भाजपला सवाल

0
362

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात करण्यात आलीय. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. पत्रकार परिषद घेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केलाय. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. यावेळी वृषभ सचदेवाचे वडील होते. अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केलीय.

वृषभ सचदेवा हा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष मोहित भारतीय याचा मेहुणा आहे. एनसीबीने ड्रग्स पार्टी प्रकरणात 1300 लोकांमधून 11 लोकांना पकडलं होतं. त्यातील 3 लोकांना सोडून देण्यात आलं. फक्त 8 लोकांना अटक दाखवली. वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना का सोडून देण्यात आलं? या प्रकरणाचा सर्व तपास हा कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅटवर अवलबून आहे. मग, या तिघांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅट का तपासले नाहीत? असा सवालही मलिक यांनी केलाय.

मुंबई पोलिसांनी क्रुझमधील सीसीटीव्ही तपासावे
भाजप नेत्याच्या मेहुण्याला आणि इतर दोघांना सोडण्यासाठी राज्य आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा दबाव होता. हे सर्व प्रकरण फर्जी आहे. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. पंचनाम्यावेळी यांचे पंच आहेत, त्यांचा वेगवेगळे पत्ते देण्यात आले आहेत, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माझी मागणी आहे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी सीआरपीएफच्या ताब्यातील बोटीचं सीसीटीव्ही मागितलं पाहिजे. त्यातून अनेक खुलासे समोर येतील, असा दावा मलिक यांनी केलाय.