डोंगरी दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू; ९ जण जखमी

0
346

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – डोंगरी येथे केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांता मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सध्या जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मालाड येथील भिंत कोसळून अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी साडेअकराच्या सुमारास मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग मंगळवाळी कोसळला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टिम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल होऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले होते. डोंगरी येथील तांडेल क्रॉस लेनमधील दुर्घटनाग्रस्त ‘२५ बी, केसरभाई’ इमारतीची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर संबंधित ट्रस्टने २५ सी आणि २५ बी केसरभाई इमारतीची संरचनात्मक तपासणी करून घेतली. या तपासणीत इमारत अतिधोकादायक असल्याचे उजेडात आल्यामुळे म्हाडाने ही इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली. मात्र, आता कोसळलेल्या इमारतीच्या भागाची जबाबदारी म्हाडाने झटकली आहे. असे असले तरी, म्हाडाच्या एकमजली बांधकामावर अनधिकृतपणे उभारलेले तीन मजले कोसळल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. म्हाडा आणि पालिकेकडून टोलवाटोलवी करण्यात येत असली तरी या दुर्घटनेत दोन्ही यंत्रणांच्या अनागोंदीमुळे रहिवासी बळी पडले आहेत.