डॉ.सुजय विखे-पाटलांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप रिंगणात

0
656

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात  राष्ट्रवादीने आपला तगडा  उमेदवार जाहीर केला  आहे.  राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरविले आहे. यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने  ही जागा काँग्रेससाठी सोडण्यास ठाम नकार दिला होता. त्यामुळे  सुजय विखेंनी  काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ  हातात घेतले आहे.

दरम्यान, सुजय विखे भाजपच्या तिकीटावर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात  आहे.  त्यामुळे विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे.  त्यामुळे  या मतदारसंघात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.