डॉ. यशवंत इंगळे यांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान

0
223

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोरोना काळात पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अगदी पध्दतशीर नियोजन आणि अखंड सेवा दिल्याबद्दल `गोरगरिबांचे डॉक्टर` अशी ख्याती असलेल्या डॉ. यशवंत इंगळे यांचा आज शहरवासियांच्या वतीने महापौर माई ढोरे यांच्या हस्ते विशेष सन्मान कऱण्यात आला. भक्ती शक्तिचे प्रतिक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे शिल्प तसेच पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन डॉ. इंगळे यांना गौरविण्यात आले. कोरोनाच्या बंधनामुळे महापालिका भवनात छोटेखनी कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.

यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह उपमहापौर नानी घुले, सत्ताधारी नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक सुरेश भोईर, केशव घोळवे आदी उपस्थित होते. महापौर माई ढोरे यांनी डॉ. इंगळे यांच्या कार्याचे यावेळी कौतुक केले.

डॉ.यशवंत इंगळे हे जुलै १९९२ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दंतशल्यचिकित्सक या पदावर सेवेत आहेत. त्यांना दंत शास्त्रातील ऑस्कर समजले जाणारे “आउट स्टँडिंग डेंटिस्ट” हा देशपातळीवरील सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच सुरुवातीपासूनच डॉ.यशवंत इंगळे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हजारो चेहऱ्याच्या व जबड्यांच्या हाडांच्या अनेक उत्तमोत्तम आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. यामध्ये आत्ताच्या घडीला कोविड पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारामध्ये जबड्याच्या हाडांमध्ये प्रादुर्भाव झालेल्या सर्वच रुग्णांच्या अत्यंत जोखमीच्या आणि कठीण शस्त्र क्रिया केलेल्या आहेत आणि करीत आहेत. राज्यभरातून या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्ण आपल्या रुग्णालयात येत आहेत. यामुळे आपल्या महापालिकेचा आणि रुग्णालयाचा लौकिक वृंद्धीगत झाला आहे. डॉ.इंगळे याना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि ते इंडियन डेंटल अससोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांना देशपातळीवरील आउट स्टँडिंग डेंटिस्ट” हा पुरस्कार आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयात करीत असलेल्या उत्तम कामगिरी मुळे प्राप्त झाला आहे आणि आपल्या शहराच्या नाव लौकिकात भर घातलेली आहे या बद्दल महानगर पालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.