Maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करू- मुख्यमंत्री

By PCB Author

October 19, 2018

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुंबईतील चैत्यभूमीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यावेळी बोलत होते.

”ज्या बाबासाहेबांमुळे सर्वांना सत्ता मिळते, पद मिळते, आम्ही मुख्यमंत्री होतो.. अशा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अनेक वर्षे इंदू मिलची जागा मिळत नव्हती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन हजार कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली आणि तिथे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे २०२० पर्यंत स्मारक पूर्ण करून त्याचे लोकार्पण करू,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

”बाबासाहेबांनी जगातले सर्वात उत्तम संविधान आम्हाला दिले आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना पावलोपावली बाबासाहेबांनी दिलेले संविधान मार्गदर्शक ठरते. त्यामुळे आमचे सरकार चालेल तर ते फक्त राज्यघटनेने चालेल.. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समतेच्या मार्गानेच चालेल,” अशी हमीही फडणवीसांनी दिली.

राज्यातील ३२ हजार शाळांमध्ये सध्या फक्त राज्यघटनेचे वाचनच होत नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यघटनेची मूल्येही शिकविली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.