डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडल्यास राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

0
381

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – “इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. तसेच गीता, बायबल आणि कुराणपेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “रोज वाद करायला अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. पण मी हात जोडून विनंती करतो, बाबासाहेबांवर वाद करु नका. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हे राज्य गहाण ठेवायला मी कमी करणार नाही. कारण बाबासाहेबांमुळे आज राज्याची ही स्थिती आहे. त्यांच्यामुळे हे राज्य पुरोगामी बनले.”

बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची कमी शंभर फुटांनी कमी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. मात्र हे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. “बाबासाहेब आभाळाएवढे उंच आहेत, कोणताही पुतळा त्यांची उंची मोजू शकत नाही. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळी याचा आराखडा तयार केला आमचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना सांगितले होते की बाबासाहेब यांचे स्मारक तयार करायचे आहे. सर्वांचे एकमत करुन घ्या. त्यांना भेटून आराखडा दाखवा, सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर घ्या. रामदास आठवलेंसह सगळे नेते आम्ही एकत्र केले, आठवलेजींनी सगळ्यांना आराखडा दाखवला. सगळ्यांनी मान्य केले. मग त्यावर सह्या झाल्या. तयार आराखड्यामुळे तसूभरही बदल केलेला नाही.”