डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्राचा उदघाटन समारंभ संपन्न

0
388

औंध, दि.१७ (पीसीबी) – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बीबीए. (सीए) विभागामार्फत व  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय  चर्चासत्राचे आयोजन दिनांक १७ व १८ जानेवारी २०२० रोजी “इंटिलिजंट डेटा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड इंटरनेट ऑफ थिंग्ज” या विषयावर करण्यात आले

संशोधक  अभ्यासकांना मार्गदर्शन करताना डॉ.प्रमोद देव म्हणाले की,  टेक्नॉलॉजीचा वापर आपण योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जातो. त्यामुळे आपण यांत्रिक होतो. इंटरनेट ऑफ थिंग्सचा (IOT) वापर जीवनाच्या अनेक क्षेत्रात केला जात आहे. उदा.स्मार्टफोन,  स्मार्ट टीव्ही,  स्मार्ट कार, स्मार्ट सिटी व स्मार्ट शेती इतर क्षेत्रांमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असून, या नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती आपण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या दुष्परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल. मानवी मेंदूत मर्यादित डेटा साठवण्याची क्षमता असल्याने, मानवाने कॉम्प्युटर,  मोबाईल फोन व पेन ड्राईव्ह यासारख्या यंत्रांचा शोध लावला आहे. मानवाने बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्या ज्ञानात बदल करायला हवेत. तरच तो बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आपले अस्तित्व सिद्ध करू शकेल. असे मत त्यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की,  एकविसावे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे व संगणकाचे युग असून, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करायचे असल्यास, आजच्या तरुणांनी  ज्ञानलालसा वाढविणे गरजेचे  आहे. तसेच त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली तरच ते इंटरनेटसारख्या माध्यमांचा योग्य व अचूकपणे वापर करू शकतात. असे मत व्यक्त केले.

या चर्चासत्रात स्मार्ट इन्व्हरमेंट, बिग डेटा एनालिसेस, क्लाउड कंप्युटिंग, ऑन गोईंग चॅलेंजेस, अँड फ्युचर डायरेक्शन, पॉवर लाईन कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी,  आय.ओ.टी. प्रोटोकॉल्स अँड डेव्हलपमेंट, प्लॅटफॉर्म इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रासाठी राज्यातील विविध महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीबीए विभागप्रमुख प्रा.मयूर माळी,  पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर, कार्यक्रमाचे आभार डॉ. सुहास निंबाळकर यांनी तर सूत्रसंचालन आय क्यू ए सी विभागप्रमुख डॉ. सविता पाटील यांनी केले.

चर्चासत्राचे उदघाटक व बीजभाषक म्हणून  एस.बी.ई.एस कॉलेज, औरंगाबादचे डॉ.प्रमोद देव उपस्थित होते.