डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश

1143

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला तब्बल पाच वर्षानंतर मोठ यश मिळालं आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी पुण्यातून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली. सचिन अंधुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडल्या. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले.

नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिनच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.

शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघे औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावचा रहिवासी आहे तो कोल्हापूर नोकरीला असल्याचे सांगायचा. सचिन अंधुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.

 

श्रीकांत नावाच्या आणखी एका व्यक्तिला जालन्यातून अटक करण्यात आली असून त्यामुळे पुढच्या काही दिवसात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.