Pune

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला ४५ दिवसांची मुदतवाढ

By PCB Author

November 18, 2018

पुणे, दि. १८ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) शनिवारी (दि.१७) ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि शरद या दोघांवर बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए) वाढविल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सीबीआयने शनिवारी न्यायालयात केली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी ४५ दिवसांत मुदत दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि बंदूक अद्याप जप्त करायची आहे. तसेच हत्या २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळे गुन्ह्यातील पुरावे शोधण्यासाठी वेळ लागणार असून त्यासाठी मुदत देणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने मुदतवाढ देताना सांगितले आहे.