डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना कधी पकडणार डॉ. हमीद दाभोलकरांचा सरकारला सवाल

0
417

पुणे, दि. (पीसीबी) – डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला येत्या २० ऑगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्या नंतर गेल्या वर्षी सीबीआय ने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षे लांबलेल्या या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्णत्वाला जाईल आणि या खुनाच्या मागील सूत्रधारांना अटक केली जाईल अशी अपेक्षा होती.पण तपास हा अतिशय संथ गतीने सुरु असल्याचे दिसून येत असल्याकडेही महाराष्ट्र अंनिसने लक्ष वेधले आहे. या वेळी महाराष्ट्र अंनिस चे प्रधान सचिव मिलिंद देशमुख ,पुणे जिल्हा कार्यध्यक्ष नंदिनी जाधव ,पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे आणि  हमीद दाभोलकर उपस्थित होते.

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. तरी देखील  शासन या संघटनेविषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही हे निषेधार्ह आहे. त्यामुळे आणखी वेळ न दवडता या सूत्रधारांवरती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.