डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पी. साईनाथ यांना सनातन संस्थेकडून ‘अनावृत्त पत्र’ !

0
245

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी दु:ख व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील काही संघटना १४ ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत काही कार्यक्रम आयोजित करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २०.८.२०१३ या दिवशी पुणे येथील आेंकारेश्‍वर पुलावर काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. डॉ. दाभोलकर यांचे समर्थक आणि कुटुंबीय यांना या हत्येविषयी शोक प्रकट करण्याचा हक्क नक्कीच आहे; परंतु २० ऑगस्ट या दिवशी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात आपण मुख्य अतिथी म्हणून संबोधित करणार असल्याचे वाचनात आले.

आपणाविषयी बरीच माहिती ‘ऑनलाईन’ उपलब्ध आहे. आपण लिहिलेली पुस्तके आणि या पुस्तकांनी गाठलेले नैतिक स्थान, ग्रामीण भारताविषयी आपला अभ्यास इत्यादी. ‘ज्या सरकारविषयी आपण लिहितो, टीका करतो, त्या सरकारकडून पत्रकारांनी पुरस्कार स्वीकारू नये’ या तत्त्वानुसार सरकारचे पुरस्कार अस्वीकार करण्याची आपली भूमिका मला खूप प्रभावित करून गेली. सध्याच्या अराजक परिस्थितीमध्ये पत्रकारितेची मूल्ये जोपासणे खूप कठीण काम आहे. सध्या ‘पेड न्यूज’ विषयी उघडपणे बोलणेही निषिद्ध असतांना या प्रकरणी आवाज उठवणार्‍यांचे नेतृत्व आपण सर्वप्रथम केल्याचे मी वाचले आहे.

सध्याच्या स्थितीत आपल्याशी बरोबरी करू शकेल, अशा थोड्याच व्यक्ती असतील आणि म्हणून माझ्या मनात घोळणारे काही प्रश्‍न आपणाला लिहून पाठवावे, असे मला वाटले; कारण त्याविषयी छडा लावून सत्य लोकांसमोर आणण्यासाठी आपण योग्य व्यक्ती आहात.

हे पत्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या आणि त्यामागचे गूढ यांविषयी आहे.

पार्श्‍वभूमी : २०.८.२०१३ या दिवशी दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघा अवैध शस्त्र विक्रेत्यांना अटक केली होती. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्राने दाभोलकर यांची हत्या करण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालात (फॉरेन्सिक रिपोर्ट) म्हटले होते. त्या न्यायवैद्यक अहवालाच्या आधारे त्या दोघांना अटक करण्यात आली होती. एका वेगळ्या खटल्यात जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची तपशीलवार चाचणी केल्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेने हा अहवाल दिला होता.

पिस्तूलच्या दृष्टिकोनातून तपास नाही !
ही हत्या झाली त्याच दिवशी ठाणे पोलिसांनी खंडेलवाल आणि नागोरी या आरोपींकडून ते पिस्तूल जप्त केले होते. ते दुसर्‍या एका प्रकरणी जप्त केले असले, तरी अगदी पहिल्या दिवसापासून ते पिस्तूल ठाणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये होते. त्यानंतर ते पिस्तूल पुणे पोलिसांकडे आले आणि त्यानंतर ‘सीबीआय’कडे आले. या कालावधीत दाभोलकर कुटुंबातील एकाही सदस्याने त्या अवैध शस्त्र विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली नाही.
बंगळुरू न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दावा केला की, ज्या पिस्तूलाने पानसरे यांची हत्या करण्यात आली, तेच पिस्तूल पूर्वी दाभोलकर यांची हत्या करण्यात वापरले होते. ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये असलेले पिस्तूल पानसरे यांची हत्या करण्यासाठी कोल्हापूर येथे कसे पोचले आणि परत ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये कसे आले, असा गोंधळ निर्माण करणारा प्रश्‍न उपस्थित होतो. या षड्यंत्रातून स्वत:ची सुटका करण्यासाठी ‘सीबीआय’ ने दुसर्‍या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणी केल्याचा दावा केला; परंतु याविषयी माझ्या माहितीनुसार सर्व न्यायवैद्यक प्रयोगशाळांच्या चाचण्यांना समान महत्त्व असते. ‘सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयापेक्षा श्रेष्ठ आहे’ ही समानता येथे लागू होत नाही. या मुद्यांवर दाभोलकर कुटुंब प्रश्‍न का उपस्थित करत नाही ? दाभोलकर कुटुंबियांनी एखाद्या विशिष्ट ‘सीबीआय’ अधिकार्‍याच्या विरोधात कारवाईची मागणी केल्याचे मी ऐकलेले नाही. एकच मागणी ती म्हणजे अप्रत्यक्षपणे ‘सनातन संस्थे’ला लक्ष्य करणे. हे आपल्याला स्वीकारार्ह आहे का?

दाभोलकर कुटुंबीय ‘सीबीआय’वर टीका करत नाहीत, पिस्तूल जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्र विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत नाहीत किंवा अवैध शस्त्र विक्रेत्यांना खोटेच अटक केलेल्या पुणे पोलिसांच्या अटकेचीही मागणी करत नाहीत. हे जे घडत आहे, ते योग्य आहे का ? हे आपल्याला मान्य आहे का ? कि आपणासही या तपासातून दिशाभूल करायची आहे का ?

दाभोलकर कुटुंबीय पुणे पोलिसांच्या अटकेची मागणी का करत नाही ? भाजप नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतांना पोलिसांनी हे कृत्य केले म्हणून ? एक तर हत्या घडवून आणण्यात वापरलेले पिस्तूल बाळगणारे खंडेलवाल आणि नागोरी दोषी आहेत किंवा अवैध शस्त्र विक्रेत्यांना या प्रकरणात खोटेच गोवणारे आणि पुरावे नष्ट करणारे पुणे पोलीस दोषी आहेत. या मुद्यावर हे दाभोलकर कुटुंबीय सोयीस्करपणे गप्प का आहेत? आपण हा प्रश्‍न त्यांना व्यासपिठावरून सर्वांसमक्ष विचारणार का?

प्रारंभी ‘सीबीआय’ ने डॉ. तावडे यांना अटक केली आणि तो मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला. तसेच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्याचा दावा केला. या आधारावर आरोपपत्र दाखल केले आणि या हत्या प्रकरणातील दोन साक्षीदारांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना ओळखल्याचा दावा केला होता. हे वर्ष २०१६ मध्ये घडले.

त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये याच ‘सीबीआय’ने आपली पूर्वीची भूमिका बदलली आणि दुसर्‍या एका साक्षीदाराच्या साक्षीवरून दाभोलकर यांची हत्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी केल्याचा दावा केला, असे का ? दाभोलकर कुटुंब आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या दोघांची छायाचित्रे भारतभर सर्वत्र चिकटवली. आता ‘सीबीआय’ आणि दाभोलकर कुटुंब सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्या कुटुंबियांची क्षमायाचना करतील का ? या क्षमायाचनेसाठी आपण आग्रह धरणार नाही का ?

दुसरा प्रश्‍न !

तपास यंत्रणा मारेकरी त्यांच्या सोयीनुसार कसे पालटू शकते ? दाभोलकर कुटुंबीय मारेकर्‍यांमध्ये असे पालट कसे करू देते ? तुम्ही याला अन्वेषण कसे म्हणाल ? कोणत्या न कोणत्या कारणाने सनातन संस्थेच्या साधकांना यात गोवून विषय ज्वलंत ठेवणे, हाच हेतू यामध्ये दिसून येतो.

साईनाथजी, तुमचे याला समर्थन आहे का?
हे प्रकरण इथेच संपत नाही. दाभोलकरांच्या संस्थेमधील व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्याने तपासात अजूनही असंख्य त्रुटी आहेत. साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने धर्मादाय आयुक्तांना दाभोलकरांच्या ट्रस्टबद्दलचा प्रस्ताव पाठवला आहे. आयुक्तांनी त्यांच्या ट्रस्टचे विशेष लेखापरीक्षण मागवले. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१. पुस्तक प्रकाशनाचा खर्च हिशेबात दाखवला जातो, पण त्यांची विक्री आणि जाहिराती यांमधून मिळणारा महसूल दाखवला जात नाही. याला भ्रष्टाचार म्हणायचे नाही का?

२. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाची छपाई आणि टपाल खर्च दाखवला जातो; परंतु उत्पन्न दाखवले जात नाही.

३. विविध गोष्टींवर दाखवण्यात आलेल्या खर्चाचा ताळमेळ नाही.

४. संघटनेच्या विविध शाखांच्या कार्यालयातून मिळणारे उत्पन्न दाभोलकरांनी ट्रस्टच्या खात्यांच्या पुस्तकांमध्ये दाखवलेले नाही.

५. ट्रस्टच्या नियमांचे पालन न करता वाहन खरेदी केले.

६. धर्मादाय आयुक्तांच्या अनुमतीशिवाय मालमत्ता विकली. हे सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन आहे.

७. इतर काही ट्रस्ट त्यांच्या ट्रस्टमध्ये विलीन झाले आहेत; परंतु त्यांची मालमत्ता पण विलीन केल्याचे दाखवलेले नाही.
तुम्ही अशा भ्रष्ट व्यक्तीला आणि त्यांच्या संस्थेला पाठिंबा द्याल का ? हा मुद्दा इथेच संपत नाही. महाराष्ट्राच्या दुर्गम भागात जे नक्षलवादी आहेत, त्यांच्या नक्षली कारवायांमध्ये दाभोलकरांच्या संघटनेचे पदाधिकारी सामील होते, त्यांना अटकही करण्यात आली होती. ‘राज्य गुप्तवार्ता विभागा’च्या अहवालात दाभोलकरांच्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेला ‘नक्षल समर्थक’ म्हणून उद्धृत केले आहे. (हे भाजप सत्तेत असताना नव्हे, तर वर्ष २०११ मध्ये काँग्रेस सत्तेत असतानाच्या कालावधीत झाले आहे.)
आपली ‘परी’ संस्था (अर्थात ‘काउंटर मीडिया ट्रस्ट’) ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कार्यरत असल्याचे सांगितले जाते, पण वास्तविक हा ट्रस्ट महाराष्ट्रात नव्हे, तर दिल्लीमध्ये नोंदणीकृत आहे. मी उपस्थित केलेले प्रश्‍न महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे एकतर आपणास दाभोलकर कुटुंबाच्या निवडक (कथित) अन्यायाच्या बाजूचे ज्ञान आहे किंवा तुम्हाला त्याचा एक भाग व्हायचे आहे. आपण माझ्याकडून या प्रकरणाची ही बाजू प्रथमच ऐकत असाल, तर या प्रकरणाच्या सर्व पैलूंची स्वतंत्रपणे माहिती घ्यावी आणि नंतर डॉ. दाभोलकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून संबोधित करावे, अशी आपणांस नम्र विनंती आहे !