डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये आठ दिवसाच्या बाळावर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.

0
785
पिंपरी, दि.१४ (पीसीबी) –  नुकतेच डॉ डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल व संशोधन केंद्र, पिंपरी येथे आठ दिवसाच्या बाळावर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. महिलेची सिझेरीयन प्रसूती करण्यात आली होती. नवजात बालकाचे शरीर निळसर पडल्याचे दिसून आले त्यानंतर बालकाचे सखोल वैद्यकीय तपासणीमध्ये असे दिसून आले की बाळाला रक्तातुन पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. संतोष जोशी, नवजात बालरोग तज्ज्ञ डॉ.माळवदे यांच्यासह डॉक्टरांच्या टीमद्वारे केलेल्या तपासणीतून असे निदान झाले की, बाळाला असामान्य जटिल जन्मजात हृदयरोग आहे याला  या आजाराला   “इन्फ्रा कार्डियाक टोटल पल्मोनरी वीनस कनेक्शन” असे म्हणतात. अशा स्थितीत फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त रक्त  हृदयाच्या वरच्या डाव्या कप्प्यात जाण्या ऐवजी ते रक्त यकृताच्या रक्तवाहिनी मध्ये जात होते. त्यामुळे हृदयाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते या बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती अश्या गंभीर स्थितीत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते.  बाळावर तात्काळ  शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. डॉ. (ब्रिगेडियर) अनुराग गर्ग यांच्या नेतृत्वात खाली हृदय व शल्यचिकित्सा  करणा-या टीमने अतिशय गुंतागुंतीची व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण  केली रुग्णाची ऑक्सिजनयुक्त रक्त वाहिनी हृदयाच्या वरच्या डाव्या कप्प्याकडे वळविण्यात आली.  शस्त्रक्रियेनंतर बाळाला पाच दिवस (व्हेंटिलेटरवर) जीवनरक्षक प्रणाली वर ठेवण्यात आले होते. त्यानंतर बाळाची प्रकृती  स्थिर असून पुढील उपचार योग्य रित्या पूर्ण करण्यात येत असून बालकाला त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
 यामध्ये बालरोग भूल तज्ञ् डॉ. (ब्रिगेडियर)  विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे, आणि हृदय शल्य चिकित्सक डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजीत पवार व परिचारिका आणि कर्मचारीवर्गाचे या दुर्मिळ अश्या हृदय शस्त्रक्रियेत सहभाग होता.
 “डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल मधील हृदयरोग शल्य चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्कृष्ट पायाभूत सेवा सुविधांमुळे आणि तज्ञ् डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जटिल जन्मजात  हृदय रोगाबाबतची दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यास यश मिळाले” असे मत डॉ अनुराग गर्ग यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले  “आमच्या हृदय रोग शल्य चिकित्सा विभागामार्फत असंख्य बाल रुग्णांवर हृदय व संवाहिनी संदर्भातील विविध शस्त्रक्रिया यशस्वी  केल्या असून ही बालके सामान्य जीवन जगत आहेत याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो”.
 डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी बाल हृदय शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे कौतुक केले आहे.