डॉक्टर कर्मचाऱ्यांचा वेतन दुप्पट करण्याचा राज्यसरकारचा निर्णय

0
323

 

चंडीगड, दि.१० (पीसीबी)  – कोरोनासारख्या गंभीर आजारापासून नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आणि अन्य आरोग्य विभागातील सेवकांचे पगार वाढवण्याचा निर्णय हरियाणा राज्य सरकारने घेतला आहे. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

गुरुवारी खट्टर यांनी काल डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स आणि इतर रुग्ण सेवक दिवस रात्र झटत आहेत. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतला.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. सध्या कर्तव्य बजावत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कित्येकदा डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे सरकारने तत्काळ पॅकेज द्यावे, अशी विनंती एका महिला डॉक्टरनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये केली. यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी आरोग्य मंत्री अनिल विज आणि विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करत असल्याची घोषणा केली.