डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रीप्शन स्वच्छ अक्षरात, कॅपिटल लेटरमध्ये आणि तर्कशुद्ध भाषेत असावेत

0
548

रांची, दि. २५ (पीसीबी) – डॉक्टर म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. त्यातही डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रीप्शन (औषधांची चिठ्ठी) म्हणजे रुग्णांसाठी एक कोडे असते. बहुतांश वेळा डॉक्टरांनी कोणती औषधे लिहून दिली आहेत हे रुग्णांना डॉक्टरांचे हस्ताक्षर न समजल्याने कळत नाही. त्यामुळे मेडिकलवाल्यासमोर ते प्रिस्क्रीप्शन टेकवायचे आणि त्याने दिलेली औषधे त्यांने सांगितलेल्या किंमतीला विकत घेण्याशिवाय रुग्णांकडे पर्याय नसतो. डॉक्टरांचे अक्षरच कळत नसल्याने लिहीता वाचता येणाऱ्यांनाही डॉक्टरांनी कोणती औषधे लिहून दिली आहेत हे समजत नाही. मात्र आता कमीत कमी झारखंडमधील रुग्णांना तरी या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कारण झारखंड सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना रुग्णांना देण्यात येणारे प्रिस्क्रीप्शन कॅपीटलमध्ये आणि समजेल अशा अक्षरातच लिहीण्याचे सक्त आदेशच दिला आहे.

शुक्रवारी सरकारने जारी केलेल्या एका परिपत्रकामधून ही माहिती देण्यात आली आहे. इंडियन मेडिकल काऊन्सिलच्या २००२ च्या नियमावलीनुसार सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टरांनी रुग्णांना लिहून देण्यात येणाऱ्या औषधांच्या नावाबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नावही (सामान्य भाषेतील) कॅपीटल लेटर्समध्येच लिहून देणे सक्तीचे करण्यात आले त्याच  नियमांच्या आधारे हा आदेश देण्यात येत असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील आरोग्य, वैद्यकिय शिक्षण आणि कौटुंबिक आरोग्य विभागाचे उप सचिव अखौरी शशांक सिन्हा यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये डॉक्टरांकडूून रुग्णांना देण्यात येणारे प्रिस्क्रीप्शन हे समजेल अशा स्वच्छ अक्षरात, कॅपिटल लेटरमध्ये आणि तर्कशुद्ध भाषेत असावेत असे सांगण्यात आले आहे.

डॉक्टरांनी या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पहिल्यांदा डॉक्टर दोषी अढळल्यास त्यांना समज देण्यात येईल, दुसऱ्यांदा चूक केल्यास काही काळासाठी त्यांची नोंदणी रद्द केली जाईल आणि तिसऱ्यांचा चूक केल्यास डॉक्टरची नोंदणी कायमसाठी रद्द केली जाईल असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकार अनेक प्रकारे डॉक्टरांना इशारा देत असले तरी मागील दोन वर्षांपासून राज्यातील डॉक्टरांनी सरकारच्या सूचनांकडे दूर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.