डॉक्टरकी सोडून हिना हिंगाड जैन साध्वी बनणार

0
331

नगर, दि. १७ (पीसीबी) – एमबीबीएस अभ्यासक्रमात टॉपर असलेल्या डॉ. हिना हिंगाड या मुंबईतील तरूणीने प्रापंचिक आयुष्याचा त्याग करून जैन साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्मिक गुरू आचार्य विजय यशोवर्मा सुरेश्वरजी महाराज यांच्या आदेशानुसार हिना हिंगाड लवकरच डॉक्टरकीचा पेशा सोडून जैन साध्वी बनणार आहे. अहमदनगर विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवणारी हिना मागच्या तीन वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात प्रक्टीस करत आहे.

हिनाला विद्यार्थी जीवनापासूनच अध्यात्मिक क्षेत्राची आवड होती. डॉक्टरकी सोडून जैन साध्वी बनण्याचा हिनाच्या निर्णयाला अनेकांना विरोध केला. तिला विचार बदलण्याचा सल्ला दिला पण हिनाने अखेर त्या सर्वांची समजूत काढली. प्रत्येकाला प्रापंचिक आयुष्य सोडून साधू किंवा साध्वी बनणे शक्य होत नाही असे हिना म्हणाली.

हिंगाड कुटुंबात एकूण सहा मुली असून हिना सर्वात मोठी मुलगी आहे. हिना सोडून जाणार म्हणून तिच्या बहिणी दु:खी आहेत पण हिनाचे समाधान लक्षात घेऊन त्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. जैन साध्वी बनण्याआधी ४८ दिवसांची ध्यनाधारणा बंधनकारक असते. हिनाने ती साधना पूर्ण केली आहे.