डेटिंग, लिव्ह इन आणि ८ वर्षांचा संसार; अभिनेता इम्रान खान घटस्फोटाच्या मार्गावर

0
374

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रेटी जोडपे घटस्फोटाच्या मार्गावर आहे. प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा भाचा आणि ‘जाने तू या जाने ना’ यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता इम्रान खान काडीमोड घेणार असल्याची माहिती आहे. आठ वर्षांच्या संसारानंतर इम्रान पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.

दोघांमधील तीव्र मतभेदामुळे आम्ही आमच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अवंतिकाने सांगितल्याचे एका वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अवंतिकाने काही दिवसांपूर्वीच मुलगी इमारासोबत इम्रानचे ‘पाली हिल’ मधील घर सोडले. सध्या ती माहेरी राहत असल्याची माहिती आहे. परंतु दोघांनीही अद्याप घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

इम्रान आणि अवंतिका यांची वयाच्या १९ व्या वर्षी भेट झाली होती. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघे लॉस अँजेलसमध्ये लिव्ह इन रिलेनशीपमध्ये राहत होते. दहा वर्षांच्या ओळखीनंतर २०११ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. २०१४ मध्ये त्याच्या मुलीचा जन्म झाला. तिचे नामकरण इमारा मलिक खान असे करण्यात आले.