डूडूळगाव येथील लेबर कॅम्पमध्ये स्त्री जातीचे अर्भक सापडले

0
245

डूडूळगाव, दि. ८ (पीसीबी) – डूडूळगाव येथील लेबर कॅम्पमध्ये मंगळवारी (दि. 6) सायंकाळी स्त्री जातीचे अर्भक सापडले. अर्भकाचा डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी मृत्यू झाला आहे.
पोलीस हवालदार अनिल बाबुराव देशमुख यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार देशमुख च-होली पोलीस चौकीमध्ये मंगळवारी ड्युटी अंमलदार म्हणून कर्तव्यावर हजर होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गणेश एकनाथ तळेकर (वय 36, रा. डूडूळगाव) यांनी फोनद्वारे देशमुख यांना माहिती दिली की, डूडूळगावातील अण्णाभाऊ साठे नगर येथील एका लेबर कॅम्पमध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक बेशुद्ध अवस्थेत पडले आहे.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक दिवसाच्या अर्भकाला पोलिसांनी तत्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी त्या अर्भकाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
लेबर कॅम्पमध्ये शौचालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत कचरा पडलेला आहे. त्या कच-यात अज्ञातांनी हे अर्भक गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने टाकल्याचे निदर्शनास आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.