Bhosari

डुडुळगावातील अनधिकृत बांधकाम न काढल्याने दिघी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा

By PCB Author

November 04, 2018

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी महापालिकेच्या नगरचना विभागाने वारंवार नोटीस बजावून देखील अनधिकृत बांधकाम न काढल्याने तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी डुडुळगावातील गाडगेनगर गट नं.१८९ येथे अनधिकृत बांधकाम केले आहे.

याप्रकरणी अनिल देवराम शिंदे (रा. ई/७, श्रीरामनगर, औंध) यांनी दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ आणि ५३ अनुसार आरोपी अनिल मनोहर मेटांगे, नम्रता देवेंद्र पाटील, सचिन भिमराव लांडे आणि अतुल खडसे (सर्व रा. गट. नं १८९, गाडगेनगर, डुडुळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल, नम्रता आणि सचिन हे तिघेही गाडगेनगर डुडुळगाव येथे राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी तेथे अनधिकृत बांधकाम केले होते. यामुळे त्यांना २१ ऑगस्ट रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र आरोपींनी त्याची ३ नोव्हेंबर पर्यंत दखल घेतली नाही तसेच अनधिकृत बांधकाम देखील काढले नाही. यामुळे अनिल शिंदे यांनी तिघा आरोपींविरोधात दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ आणि ५३ अनुसार आरोपी अनिल, नम्रता आणि सचिन या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.