‘डीजे’ हट्ट धरणाऱ्या गणेश मंडळावर गुन्हे नोंदवणार- चंद्रकांत पाटील

0
656

पुणे, दि. १४ (पीसीबी) ‘पुणेकरांच्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर कोणत्याही प्रकारचे विरजण घालण्याचा प्रकार प्रशासन करणार नाही. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मिरवणुकीतून ‘डीजे’ बंद करण्यासाठी प्रबोधन हा सर्वांत उत्तम मार्ग आहे, पण प्रबोधनानेही जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेच लागतील,’ अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरवणुकीत ‘डीजे’ वापर न करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पुणे शहर पोलिस आणि विघ्नहर्ता न्यास यांच्यातर्फे आयोजित आदर्श गणेश मंडळ पुरस्कार सोहळा, तसेच गणेश मंडळांच्या बैठकीत पाटील बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री दिलीप कांबळे, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अॅड. प्रताप परदेशी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या केल्या. गणेशोत्सवात सात दिवस रात्री बारा वाजेपर्यंत साउंड सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, ढोल-ताशांच्या सरावाला त्वरीत परवानगी मिळावी, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करू नयेत आणि कोणत्याही प्रकारे मिरवणुकीच्या दिवशी लाठीचार्ज केला जाऊ नये, या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता.

‘केवळ गणेशोत्सवातच नाही, तर यापुढे जिल्ह्यामध्ये कोणत्याही समाजाच्या, समुदायाच्या कार्यक्रमात, मोठमोठ्याने स्पीकर वाजले, तर त्यांच्यावर पुढील एका महिन्याच्या आत कडक कारवाई केली जाईल. म्हणजे केवळ आमच्याच उत्सवावर बंधने का, असा प्रश्न उरणार नाही. ‘डीजे’चा वापर थांबवण्यासाठी केवळ प्रबोधन हा एकमेव मार्ग आहे. प्रबोधनानेही हे थांबले नाही, तर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरत नाही, असे सांगून पाटील यांनी गणेश मंडळांना एकप्रकारे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या.