डीजे, डॉल्बीचा धिंगाणा मैदानावर घाला; चंद्रकांत पाटलांनी उद्यनराजेंना सुनावले

0
1253

सातारा, दि. १८ (पीसीबी) – डीजे किंवा डॉल्बीच्या तालावर नाचायचे असेल, तर खुशाल मोकळ्या मैदानावर जा. प्रत्येक गावात एक मैदान असते, त्या मैदानावर जो काही धिंगाणा घालायचा असेल, तर तो घाला, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उद्यनराजे भोसले यांना आज (मंगळवार) येथे सुनावले.    

दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील ३१ गावांसाठी राबवलेल्या टेंभू जलसिंचन योजनेचे  भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती चौकात आणला. कारण त्यांना लोकांना संघटित करायचे होते. आता मात्र चौकातील उत्सव घरात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा, असा सल्लाही पाटील यांनी उदयनराजेंना दिला. त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदार संघात भाजपचाच खासदार विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, साताऱ्यात गणपती आगमनावेळी उदयनराजेंनी बोलताना डॉल्बी लागलीच पाहिजे, असे सांगून  २३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होते आणि काय नाही होते आणि कसे नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजे, डेसीबल ठरवणारे न्यायालय आणि पोलिस खाते कोण आहेत? असा तिरकस सवाल त्यांनी केला होता.