Pune

डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जन करणार नाही, पुण्यात गणेश मंडळांचा इशारा

By PCB Author

September 22, 2018

पुणे, दि.२२ (पीसीबी) – गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील गणेश मंडळे एकवटली आहेत. ‘डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जनही करणार नाही,’ असा इशारा शहरातील मंडळांनी दिला आहे.  पुण्यातील ८० हून अधिक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत न्यायालयाने गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. हा वाद उच्च न्यायालयातही गेला होता. मात्र, तिथेही गणेश मंडळांना दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. मंडळांनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. ‘सरकार हिंदूंच्या सणावर गदा आणत आहे. न्यायालयात सरकारने मंडळांची बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मंडळांना वेळही देण्यात आलेला नाही, अशी भावना मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. सरकारने डीजे सिस्टीमला परवानगी द्यावी, अन्यथा कोणतेही मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार नाही. सरकारचा निषेध करत मंडळे आपला गणपती मांडवातच ठेवतील,’ असा निर्धार मंडळांनी व्यक्त केला आहे.