डीजेची गरज आपल्याला बाप्पाला नाही; पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0
541

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बी वापरले जात आहेत. याची गणपतीला नव्हे, तर आपल्यालाच गरज असते. या सर्व गोष्टी टाळून पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला हवा, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ‘वर्षा’ या आपल्या निवासस्थानी श्री गणेशाचे विसर्जन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना डीजेला अप्रत्यक्षपणे विरोधच दर्शवला.

मुंबई हायकोर्टाने यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये पर्यावरणाला हानिकारक असल्याचे सांगत डीजे वाजवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात सध्या वाद सुरु आहे. कोर्टाच्या या निर्णयाला अनेक गणेश मंडळांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, गणपतीला डीजे आणि डॉल्बीची गरज नसून ती आपल्यालाच भासते. यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदुषण होते. मात्र, हे सर्व आपल्या उत्साहासाठी असले तरी या उत्सवातील पारंपारिक वाद्यांचा उत्साह हा डीजे-डॉल्बीपेक्षा चांगला असतो. त्यामुळे पारंपारिक वाद्ये वाजवणे योग्य आहे. मात्र, लोकांच्या उत्साहात कमतरता यावी असे माझे मत नाही. मात्र, निसर्ग आणि पारंपारिक उत्सवांचाही आपण विचार करणे गरजेचे आहे.

आपल्याकडील उत्सव हे निसर्गाची पूजा करणारे आहेत. दुर्दैवाने यातील नैसर्गिकता आपण घालवत आहोत. ईश्वराची पूजा करणे म्हणजे निसर्ग पूजा असते, आपली शक्तीपीठे ही निसर्गातच वसली आहेत, म्हणून निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.