Desh

डिसेंबरपर्यंत देशात आणखी लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होणार

By PCB Author

May 13, 2021

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. डिसेंबरपर्यंत देशात लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होतील अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.  देशात आतापर्यंत सुमारे 18 कोटी लशींचे डोस देण्यात आले असून लसीकरणाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिसेंबरपर्यंत देशात आणखी लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती निती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालय, निती आयोग यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी ही माहिती सर्वांना दिली.

ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात जवळपास 216 कोटी लसींची निर्मिती करण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीचं लसीकरण बाकी राहील, ही शंका बाळगू नये, असंही डॉ. पॉल म्हणाले. देशात स्पुटनिक लशीला परवानगी देण्यात आलेली आहे. ही लस भारतात दाखल झाली असून पुढच्या आठवड्यात ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. या लशीचा रशियातून होणारा पुरवठा योग्य प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. विविध लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर देशात डिसेंबरपर्यंत 8 कंपन्यांच्या सुमारे 216 कोटी लशी उपलब्ध होतील. कंपन्यांशी चर्चा करूनच ही आकडेवारी देण्यात आली आहे, असं पॉल म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची सूचना मान्य केली आहे. कोव्हिड वर्किंग ग्रूपने ही सूचना सरकारला केली होती. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आधी 6 ते 8 आठवडे करण्यात आलं होतं, असं डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं. “कोव्हिडशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं सुरक्षित आहे. आता यूकेमध्ये लसीकरणाचा डेटा मिळालाय. त्यामुळे शास्त्रिय दृष्टीने स्पष्ट झालं की लोकांना त्रास होणार नाही. त्यामुळे कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये 12-16 आठवड्यांचं अंतर ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय.”

आतापर्यंत 18 कोटी डोस – देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली. आतापर्यंत देशात 13.76 जणांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 3.69 कोटी नागरिकांना लशीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे, असं अगरवाल यांनी सांगितलं.