Maharashtra

डिझेलचे दर आणखी चार रुपयांनी कमी करणार – मुख्यमंत्री

By PCB Author

October 05, 2018

नाशिक , दि. ५ (पीसीबी) –  केंद्र आणि राज्य सरकारकडून डिझेलचे दर आणखी चार रुपयांनी कमी करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे दिली. यामुळे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना  पुन्हा एकदा दिलासा मिळणार आहे. 

स्थानिक करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलही जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार डिझेलच्या दरात आणखी चार रुपयांपर्यंत कपात करण्यास प्रयत्नशील आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

राज्यात पेट्रोल साडेचार रुपयांपर्यंत, तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तरी नागरिकांना याचा साडेचार ते चार रूपयांचा फायदा झाला आहे. लिटरमागे पूर्ण पाच रुपये कमी झालेले नाहीत.

दरम्यान, राज्यात पेट्रोलवरील व्हॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे, मात्र डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने एक्साईज ड्यूटी दीड रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनीही एक रुपयांचा दिलासा दिला आहे. याप्रमाणे राज्यात पेट्रोलसाठी किमान पाच रुपये दिलासा मिळणे अपेक्षित आहे, मात्र, पूर्ण पाच रुपयांचा फायदा ग्राहकांना मिळालेला नाही.