Banner News

डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात प्रथम

By PCB Author

September 10, 2018

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘डिजिटल पेमेंट’ची प्रत्यक्षातील कार्यवाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू करून, सातत्याने त्यात प्रगती केली. महापालिकेचा सर्व व्यवहार कॅशलेस व्हावा, याकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाले आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी १ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक महत्त्वाची पाऊले टाकली आहेत. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयामार्फत होणारे सर्व व्यवहार १०० टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा दर महिन्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठविला जात आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने केले जाते. त्यासाठी संबंधित बँकेने सर्वांना एटीएम व डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाइन डिजिटल पद्धतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे महापालिका द्वितीय, नाशिक महापालिका तृतीय, तर सोलापूर महापालिका चौथ्या स्थानावर आहे. डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला अग्रस्थान मिळाल्यामुळे प्रशासनाचे कौतुक होत आहे. विशेषतः महापालिकेचे मावळते मुख्य लेखापरीक्षक राजेश लांडे यांनी व्यवहारांसाठी केलेल्या अनेक सुधारणांमुळे डिजिटल पेमेंटमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाले आहे.