डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचा विरोधी पक्षांसह मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून निषेध 

0
778

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या संशयावरून डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकून त्यांना  अटक  केली आहे. याचा  विरोधी पक्षांसह मानवी हक्क कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. तर हिंदुत्ववाद्यांवरील कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी  डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप भारिप बहुज महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाठीशी घालण्यासाठीच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबई, दिल्ली, रांची, गोवा आणि हैदराबादेत डाव्या विचारसरणीच्या काही लोकांच्या घरावर छापे टाकले. तसेच, सुधा भारद्वाज, वरवरा राव व गौतम नवलखा अशा काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेशी संबंध आहे. तसेच  या हिंसाचारामागे नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या कार्यकर्त्यांचा हात आहे, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डाव्या पक्षांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.