डांबरीकरण, सुशोभीकरणाच्या नावाखाली करदात्यांच्या कोटींची उधळपट्टी; राहुल कलाटे, प्रशांत शितोळे यांचा आरोप

0
229

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) –  सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे पर्यंतचा रस्ता,डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता आणि औंध ते रावेत या रस्त्यांचे डांबरीकरण आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली करदात्यांच्या 100 कोटी रुपयांची महापालिका प्रशासन, सत्ताधारी उधळपट्टी करणार आहेत. 40 कोटी रुपयांचे काम तर थेटपद्धतीने एका ठेकेदाराला देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला.

शिवसेना गटनेते कलाटे, शितोळे यांच्यासह पत्रकारांनी आज (बुधवारी) या रस्त्याची पाहणी केली. साधा एक खड्डाही नसताना या रस्त्यावर 100 कोटींची उधळपट्टी का करायची आहे, महापालिकेत नेमके चाललंय काय?, या कामाद्वारे प्रशासन सत्ताधा-यांना इलेक्शन  फंड गोळा करुन देत आहे का, सुस्थितीतील रस्त्यावर महापालिका कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी आणि कोणासाठी करत आहे, असा सवाल करत याप्रकरणी राज्य सरकारसह न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.

औंध-रावेत रस्ता चांगला आहे. रस्त्यावर एकही खड्डा नाही. हा रस्ता पुणे-पिंपरी-चिंचवडला जोडणारा आहे. हिंजवडीलाही या रस्त्यानेच जाता येते. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते.  सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईननुसार विकसित करणे ( 14 कोटी 74 लाख 63 हजार 604 रुपये), डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता (16 कोटी 27 लाख 27 हजार 474 रुपये) आणि औंध ते रावेत रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे व अनुषंगिक कामे करणे (30 कोटी 96 लाख 46 हजार 112)  अशी सुमारे 62 कोटी रुपायांची कामे करण्यात येणार आहेत. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली असून यातील 30 कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डरही आयुक्तांनी दिली आहे.

 तब्बल 40 कोटी रुपयांचे काम स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराला थेट पद्धतीने देण्याचा घाट घातला आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आम्ही विरोध केल्याने ते थांबले असल्याचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले.  100 कोटी रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे चार टप्प्यात विभागून हा खर्च केला जाणार आहे. वास्तविक पाहता या रस्त्यांवर कोणतेही काम करण्याची आवश्यकता नाही. तरी देखील जनतेच्या कररुपी 100 कोटी रुपयांची नाहक उधळपट्टी केली जात आहे. हे करताना काही अधिका-यांनी आयुक्तांचीही दिशाभूल केली. सत्ताधारी दबाव टाकून हे काम करत इलेक्शन फंड गोळा करत असल्याचा आरोप कलाटे, शितोळे यांनी केला.