डांगे चौकात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास

0
866

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी बँकेत पैसे भरण्यासाठी निघालेल्या एका इसमाला अडवून त्याच्याजवळील पावणेतीन लाखांची रोकड आणि एक मोबाईल जबरदस्तीने हिस्का मारुन चोरुन नेला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी दीडच्या सुमारास डांगे चौकात घडली.

याप्रकरणी दिलीप नारायण कांबळे (वय ४२, रा. फाईव्ह नाईन चौक, येरवडा) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कांबळे हे रेडीयंट कॅश मॅनेजमेन्ट या खासगी कंपनीत रोख रक्कम गोळा करण्याचे काम करतात. मंगळवारी ते चिंचवड परिसरातील काही कंपन्यांमधील रोख रक्कम गोळा करुन ती बँकेत भरण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरुन निघाले होते. ते डांगे चौकात पोहचले असता मागून कारमध्ये आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले आणि त्यांच्या जवळील पावणेतीन लाखांची रोकड असलेली बॅग आणि मोबाईल जबरदस्तीने हिस्कावून फरार झाले. कांबळे यांनी त्वरीत वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.