ठेकेदाराचा हलगर्जीपणा; नादुरुस्त मशीनची डाई हातावर पडल्याने ऑपरेटरची पाच बोटे तुटली

0
269

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – प्रेस मशीन मधून जॉब काढत असताना अचानक प्रेस मशीन बंद पडली. त्यामुळे अवजड डाई ऑपरेटरच्या हातावर पडली. यामध्ये ऑपरेटरच्या हाताची पाचही बोटे तुटली. ठेकेदाराने मशीन दुरुस्तीबाबत हलगर्जीपणा केल्याने हा प्रकार घडला आहे. याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता एमआयडीसी भोसरी येथील शार्प ऑटो प्रायवेट लिमिटेड या कंपनीत घडली.

राजू प्रभाकर रणदिवे (वय 43, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. शिरूर ताजबन, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे जखमी ऑपरेटरचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ठेकेदार सुभाष व्यंकटराव ढोपरे (रा. आदर्शनगर, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणदिवे एमआयडीसी भोसरी येथील शार्प ऑटो प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रेस ऑपरेटर म्हणून काम करत होते. प्रेस मशीन मधून जॉब काढत असताना मशीन अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे अवजड डाई रणदिवे यांच्या हातावर पडली. त्यात रणदिवे यांच्या हाताची पाच बोटे तुटली.

कंपनीने ठेकेदार सुभाष याच्याकडे मशीनच्या देखभालीचे काम दिले होते. सुभाष याने मशीनची देखभाल व्यवस्थित न केल्याने हा प्रकार घडला. तसेच कामगाराच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.