ठाण्याचे सुपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद

0
644

ठाणे, दि. ७ (पीसीबी) – उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचे ४ जवान आज (सोमवार) शहीद झाले. यात ठाण्याचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (वय २९) शहीद झाले आहेत. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे वृत्त येताच परिसरात शोककळा पसरली आहे. यावर्षी कौस्तुभ यांना सेना पदकाने गौरविण्यात आले होते.

मेजर राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोड येथील शीतलनगर येथील हिरल सागर इमारतीत कुटुंबीयासह राहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ते मूळचे कोकणातील वैभववाडीचे रहिवाशी आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब सुमारे ३० वर्षांपासून मीरारोड परिसरात राहत आहे.

कौस्तुभ राणे यांनी हॉली क्रॉस शाळेत शिक्षण घेतले होते. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत नोकरीला होत्या. सध्या दोघेही निवृत्त आहेत. तर कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका आणि अडीच वर्षांचा मुलगाही येथेच राहत होता. कनिका मुलाला घेऊन गावी गेल्या आहेत. तर आई-वडीलही गावी जायाच्या तयारीत होते. इतक्यात कौस्तुभ यांचे शहीद झाल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.