Maharashtra

ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धरणे आंदोलन

By PCB Author

December 03, 2019

ठाणे, दि.३ (पीसीबी) – ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी मानवी साखळीचे आयोजन केले होते. या आंदोलनाचा दूसरा टप्पा म्हणून आनंदनगर टोल येथे मनसे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

दररोज कामानिमित्त ठाण्यातून मुंबईत आणि पुन्हा मुंबईतून ठाण्यात परतणाऱ्या ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजी आहे. ठाण्यातील वाहनांना टोलपासून मुक्ती मिळावी अशी मागणी वारंवार होत होती. यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी प्रयत्नही झाले होते. तरीही टोलमुक्ती  मिळाली नसून आता टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

यापूर्वी मनसेने ९ नोव्हेंबर रोजी टोलमुक्ती करण्यासाठी आनंदनगर टोलनाका ते कोपरीपुलापर्यंत मानवी साखळीचे आयोजन केले होते. मात्र अयोध्या निकालामुळे पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याने आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते.