Maharashtra

ठाकरे सरकारचा भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठा दणका

By PCB Author

January 08, 2020

मुंबई,दि.८(पीसीबी) – महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपला पहिला मोठा दणका देण्यात आला आहे. महामंडळावरचे जुने अध्यक्ष हटवायला सुरुवात करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

‘सिडको’च्या अध्यक्षपदी प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये केली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने ही नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकूर हे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक मानले जातात.

मंत्रिमंडळात वर्णी न लागलेल्या एखाद्या नाराज आमदाराला सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.‘सिडको’च्या अध्यक्षपदी आता नवीन चेहरा दिसणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर फेरविचाराचं धोरण अवलंबलं आहे. काही निर्णयांना स्थगिती मिळाली आहे, तर काही निर्णय रद्दही करण्यात आले आहेत.