Pune

ठाकरी शैली 100 वर्षे टिकून

By PCB Author

January 27, 2021

अजित पवार यांचे गौरवोद्गार : संवाद पुणे आयोजित प्रबोधन महोत्सवाचा समारोप प्रबोधन महोत्सव दिल्लीत घेतल्यास राज्यशासनाचे सहकार्य

पुणे, दि. २७ (पीसीबी) : प्रबोधनकारांची ओळख बहुआयामी व्यक्ती अशी आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी किती हालअपेष्टा सोसल्या हे त्यांचे साहित्य वाचल्यानंतर समजते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रबोधनकारांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या साहित्य आणि विचारात बंडखोरी दिसते. त्यांची ठाकरी शैली 100 वर्षे झाली तरी अजूनही टिकून आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. प्रबोधनकार यांच्या विचारांचा जागर होण्यासाठी दिल्लीत कार्यक्रम घेतल्यास राज्यशासन त्यास पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा मंगळवारी (दि. 26 जानेवारी 21) समारोप झाला. समारोप समारंभात पवार बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे, खासदार गिरीश बापट, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, अभिनेते सुशांत शेलार, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, सचिन इटकर, किरण साळी, आमदार संजय शिंदे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे व्यासपीठावर होते.

पवार म्हणाले, प्रबोधनकारांचे विचार किती परखड होते हे त्यांचे साहित्य वाचल्यानंतर कळते. ज्या प्रबोधन पाक्षिकाची शताब्दी साजरी होत आहे, त्या पाक्षिकाची भूमिका महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची ठरली आहे. समोज प्रबोधनासाठी हे पाक्षिक सुरू करण्यात आले. आपल्या भूमिकेवर ठाम असले की व्यवस्थेशी लढण्याचे बळ मिळते हे प्रबोधनकारांच्या भूमिकेतून दिसून येते. त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही म्हणून ते प्रबोधनकार ठरले. प्रबोधनकारांचा हाच वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे चालवित असल्याचे ते म्हणाले. गिरीश बापट म्हणाले, प्रबोधनकार कट्टर सुधारणावादी, सत्यशोधक होते. विरोध झाला तरी ते निर्भयपणे समाजासमोर सत्य मांडत. समाजातील वर्णव्यवस्था, ढोंगीपणावर ते आपल्या वाणी आणि लेखणीद्वारे टिकास्त्र सोडत. समाजात विचारांची क्रांती व्हावी यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, जातीव्यवस्थेवर प्रहार केले. तत्त्वासाठी त्यांना मित्रही गमवावे लागले.

डॉ. निलम गोर्‍हे यांनी प्रबोधनकारांच्या विचारांची महती विषद करताना त्यांचे विचार या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचतील असे नमूद केले. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे म्हणजे कृतिशिल पुरोगामी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार आजही लागू पडतात. त्यांचे विचार समाजापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. प्रबोधनकार लिखित ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. स्वागतपर प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संवाद पुणेच्या कार्याचा आढावा सादर करत प्रबोधन महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका उपस्थितांसमोर मांडली. प्रबोधनकारांचे विचार महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात घेऊन जाण्याचा विचार असल्याचे महाजन यांनी विशेषत्वाने सांगितले. सचिन इटकर यांनी महोत्सवाचे इतिवृत्त सादर केले. मान्यवरांचे स्वागत निकिता मोघे, किरण साळी, हरिश केंची, रघुनाथ कुचिक यांनी केले. कोरोना काळात कलावंतांसाठी केलेल्या कार्याबद्दल अभिनेते सुशांत शेलार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.