ठराविक विभागात बदलीसाठी राजकीय दबाव आणून प्रशासनास वेठीस धरु नका, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई – आयुक्त राजेश पाटील

0
236

पिंपरी दि. ११ (पीसीबी) –
– पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी यापुढे ठराविक विभागात बदलीसाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. काही अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून प्रशासनास वेठीस धरत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका आस्थापनेवर विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यासंदर्भात महापालिकेच्यावतीनेही 13 फेब्रुवारी 2015  रोजीच्या परिपत्रकानुसार धोरण निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनामार्फत करण्यात येणा-या बदल्या या सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने केल्या जातात. अशा बदल्या करताना महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल, सर्व विभागात आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत राहतील, अशा प्रकारचे नियोजन प्रशासनामार्फत केले जाते. तथापि, काही अधिकारी, कर्मचारी बदली करण्यात आलेल्या किंवा नियुक्त केलेल्या विभागांमध्ये रूजू होत नाहीत.

बदली रद्द करण्यासाठी तसेच महापालिकेच्या काही विशिष्ट विभागांमध्येच वारंवार बदली किंवा पदस्थापना मिळविण्यासाठी राजकीय पदाधिकारी आणि अशासकीय व्यक्तींमार्फत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. अशा अधिकारी, कर्मचा-यांची सचोटी संशयास्पद असल्याचे स्पष्ट होते. यामुळे प्रशासनासमोरील उद्दीष्टपूर्ती करता येत नाही. परिणामत: बदल्यांसंदर्भात धोरणाची अंमलबजावणी करताना प्रशासनाला अडचणीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 10 जानेवारी रोजी पुन्हा परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, बदली मिळण्याबाबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून प्रशासनास वेठीस धरल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचा-यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन करणारी ठरते. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचा-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा आयुक्तांनी दिला आहे.