ठरलं! आता शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

0
405

सोलापूर, दि.०७ (पीसीबी) : सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश विष्णुपंत कोठे यांनी आता शिवसेनेला पाठ करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे हे राष्ट्रवादीचे घड्याळ उद्या हातात बांधणार आहेत. कोणतीही अट न ठेवता आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असलो तरी आमदारकीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होईल, असा आशावादही कोठे यांनी मनाशी बाळगला आहे.सोलापूर शहर उत्तरमधून महेश कोठे यांनी यापूर्वी २००९ साली काँग्रेसच्या तिकिटिवर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना हार पत्करावि लागली होती. नंतर २०१४ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी झुंज देताना कोठे हे तिसऱ्या स्थानावर गेले. त्यांच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी घालण्यात आली होती. परंतु दोनवेळा पराभव होऊनही पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली मात्र शिवसेनेने शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे सेना बंडखोर म्हणून आपले भवितव्य अजमावून पाहिले. परंतु तिसऱ्यांदा पदरी निराशाच आली. २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोठे यांनी सेनेच्या नगरसेवकांची संख्या ८ वरून थेट २१ वर वाढवून शहरात स्वतःसह सेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतून हकालपट्टी झाली तरी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडेच शाबूत राहिले होते.

आता कोठे हे राष्ट्रवादीत जात असल्यामुळे शिवसेनेत यावर चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीची सत्ता टिकविताना शिवसेना व दोन्ही काँग्रेसमध्ये कोणीही एकमेकांचा पक्षाला खिंडार पाडायचा नाही, असे अलिखित ठरले आहे. तरीही शिवसेनेचे महेश कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात असताना राष्ट्रवादीने सोलापुरात शिवसेनेत लगेचच खिंडार पाडायचे नाही, असे ठरविल्याचे संकेत मिळत आहेत. कारण महेश कोठे हे तूर्त एकटेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत त्यांच्या घरातीलच चार नगरसेवक आहेत. याशिवाय अन्य निकटचे नातेवाईक असलेले तीन नगरसेवक आहेत.