Maharashtra

‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’; देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंवर विरोधकांची पोस्टरबाजी

By PCB Author

November 18, 2018

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आमीर खानच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत विरोधी पक्षांनी ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’चे पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ठगांच्या रुपात दाखवले आहे.

मुंबईत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी येथे लावलेले बॅनऱ चर्चेचे विषय ठरले आहे.

या बॅनरवर आमीर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले आहेत. शिवाय ‘ठगबाजीची चार वर्षे’ असे शीर्षक या पोस्टरला दिले आहे. सोमवारपासून (दि.१९) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात तयारी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या चार वर्षांच्या कार्यकाळाला विरोधकांनी ठगबाजीची चार वर्षे असे संबोधले आहे. त्यावर त्यांनी जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी अशी विविध शीर्षके दिली आहेत. या माध्यमातून विरोधकांनी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे.