” ट्विटरवर राज्य चालते असा गैरसमज करून घेऊ नये,” – दीपक केसरकर

0
507

महाराष्ट्र, दि.७ (पीसीबी) – ” ट्विटरवर राज्य चालते असा गैरसमज करून घेऊ नये,” असा खोचक टोला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी भाजप आमदार नितेश राणेंना लगावला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.

ते म्हणाले, ” काही जणांना वाटते की बैलगाडी जी चालली आहे. ती मागे बांधलेल्या कोकरूमुळेच चालते पण तो भ्रम असतो. त्यामुळे कोणाच्या ट्विटमुळे राज्यात निर्णय होत नाही.” मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे हे शिवसेना व उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या टीकेला केसरकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच सिंधुदुर्गमधील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. फक्त नवीन सरकार आल्यावर पूर्ण सरकारच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून तसेच सध्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले गेले पाहिजे हे पाहून काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय घेतले आहे. जी कामे सुरू आहेत. ती कामे सुरू रहातील पण काही कामे अद्याप सुरू नसल्याचे केसरकर म्हणाले.

दरम्यान, कोकणातील मंदिरांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे राणे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.